पुणे : महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी, अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जागावाटप उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरु आहे. पुणे कॅन्टॉन्मेट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- भाजपमध्ये चुरस दिसणार आहे.
१९७८ पासून ते २०१४ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या मतदारसंघात २०१४च्या मोदी लाटेत भाजपच्या दीलीप कांबळे भाजपचा झेंडा रोवला. त्यानंतर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दीलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांना उमेदवारी देत पुन्हा एकदा कांबळे कुटुंबालाच प्राधान्य देण्यात आले. सुनील कांबळेंनी पुन्हा एकदा काँग्रेसला पराभूत करत मतदारसंघात जागा राखली.
दरम्यान, दोन वेळा भाजपने विजय मिळत वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र पारंपारिक मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचं स्वप्न काँग्रेस पाहत आहे. काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात काँग्रेसची चांगलीच ताकद आहे. मात्र, काँग्रेसकडून इच्छुकांची चांगलीच रांग लागल्याचंही पहायला मिळत आहे.
माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, शिवसेना (ठाकरे) पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले अॅड. अविनाश साळवे, माजी नगरसेविका लता राजगुरू, मिलिंद अहिरे यांच्यासह एकूण अकरा उमेदवारांनी मुलाखती दिल्याने पक्षांतर्गत चुरस निर्माण झाली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात रमेश आणि अविनाश बागवे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने यंदा पिता-पुत्र इच्छुक आहेत. मात्र, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी साळवे यांना पक्षात घेऊन बागवे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. आता काँग्रेसच्या गृहकलहाचा भाजपला पुन्हा फायदा होणार? की काँग्रेस आपला पारंपारिक मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भावी अधिकाऱ्यांच्या स्वप्नांची राख; अभ्यासिकेला आग, विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले
-अजितदादांच्या शिलेदाराचा ठाकरे सेनेत प्रवेश; चिंचवड विधानसभेचं गणित बदलणार?
-कसब्यात काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा, महिला नेत्याचा लढण्याचा नारा; धंगेकरांना डोकेदुखी
-भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबनाची कारवाई! मावळमध्ये काय राजकीय राडा?
-राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयीन तत्परतेने १२० विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा!