पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जागावाटपाचा प्रश्न मिटवण्याची लगबग सुरु झाली. अशातच महाविकास आघाडीचे पुणे शहरातील काही जागांबाबत अद्यापही एकमत होत नसल्याचे दिसत आहे. शहरातील ८ पैकी ४ मतदारसंघावरुन आघाडीत तिढा आहे तो अद्यापही सुटला नाही. कसबा, कोथरूड, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार असून शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. वडगाव शेरी, खडकवासला आणि हडपसर या ३ मतदारसंघावर राष्ट्रवादी आणि सेनेने दावा केला आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये ठाकरे सेना-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारीवरुन रस्सीखेच पहायला मिळत आहे. तसेच पर्वती मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यातील ३ जागा हव्या आहेत. त्यापैकी कोथरुडची जागा सेनेकडे राहणार आहे. कोथरुडप्रमाणेच हडपसरमध्येही शिवसेनेची ताकद जास्त असल्याने सेनेला हडपसर मतदारसंघही देखील हवा आहे. हडपसरवर केलेल्या दाव्याने राष्ट्रवादीला अडचण होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेने हडपसरवरील दावा सोडण्यासाठी वेळ पडली तर तडजोड म्हणून पर्वती मतदारसंघ देण्याची तयारी सुरु आहे. परिणामी काँग्रेसकडून इच्छुक असून तयारी करत असलेल्या माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.
शिवसेनेकडून पर्वतीसाठी प्रबळ दावेदार म्हणून माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांचे नावही पुढे केले आहे. मात्र, पर्वती शिवसेनेला देण्यासाठी काँग्रेसकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये चांगलीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदलांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त
-कसब्यात इच्छुकांकडून ब्राह्मण कार्डची खेळी, भाजप बहुजन उमेदवार डावलणार का? राज्यात वातावरण तापणार
-खडकवासल्यात राजकीय राडा; महायुतीच्या सेना-भाजपचे इच्छुक आमने-सामने, अन् पुढे काय घडलं?
-चाकणकरांना पुन्हा मिळालं महिला आयोगाचं अध्यक्षपद; दादांच्या राष्ट्रवादीत वादाच ठिणगी
-Assembly Election: अखेर जानकरांनी दोर तोडले; भाजपला रामराम करत महायुतीतून एक्झिट