पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या प्रलंबित होत्या. काल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी राज्यपाल नियुक्त १२ पैकी ७ आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावरुन महायुतीमध्ये कलह सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्यामुळे अजित पवारांच्या शहरातील ६०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
‘मी मागील ४० वर्षांपासून राजकीय आणि समाजिक जीवनात आहे. या संपूर्ण कालावधीत राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली. पदांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्याच दरम्यान मागील दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम केले आहे. या संपूर्ण कालावधीत माझ्यावर अजित पवार आणखी जबाबदारी देतील असे वाटत होते. त्याबाबत सांगायचे झाल्यास माझ्यासह शहरातील कार्यकर्त्यांना वाटत होते की, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत माझे नाव असेल. पण, माझ्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे काल असंख्य कार्यकर्ते नाराज होऊन त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मीही माझ्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मी यापुढे कार्यकर्ता म्हणून काम करेन”, असे दीपक मानकर म्हणाले आहेत.
“ज्यावेळी राज्यपालांकडे नावे पाठविण्यात आली किमान त्यावेळी तरी दादांनी मला विचारले पाहिजे होते. मात्र त्याबाबत विचारणा केली नाही. मी कुठे कमी पडलो? हे मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं असतं. मला कुठेही जायचं नाही. अजितदादांसोबतच रहायचं आहे पण शनिवारी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असून शहरात कायम आपला कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार आहे. जर तुम्ही तुमच्याच घरात पदं देत बसलात तर पालकमंत्री आहात तुमच्या कार्यकर्त्यांना कधी ताकद देणार?”, असा सवालही यावेळी दीपक मानकरांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आचारसंहिता लागू झाली तरीही पुण्यात राजकीय पोस्टरबाजी कायम; कारवाईस टाळाटाळ
-आमदारकी हुकली पण, पुन्हा एकदा महिला आयोगाचं अध्यक्षपद; चाकणकरांना लागली लॉटरी
-Chinchwad: जगताप कुटुंबाला स्वकियांकडूनच विरोध; विरोधी उमेदवार होणार फायदा?
-‘महाविकास आघाडीची २१८ जागांवर एकवाक्यता’ पण हडपसरचं काय? अमोल कोल्हे म्हणाले…