इंदापूर | पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील यश पाहता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. जेष्ठ नेते शरद पवारांनी महायुतीला धक्का देत अनेक बडे नेते आपल्या गळाला लावले. त्यातच इंदापूरचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेत भाजपला धक्का दिला मात्र, त्यांच्या राष्ट्रवादीत मोठा पेच निर्माण झाला आहे.
हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून इंदापुरातून उमेदवारी मिळणार नसल्याचं दिसताच हाती तुतारी घेतली. त्यांच्या राष्ट्रवादीत येण्याला अनेक स्थानिक नेत्यांनी विरोध केला. पक्षात घेऊन पाटलांना थेट उमेदवारी देखील देण्यात आली त्यामुळे स्थानिक नेत्यांची नाराजी आणखी वाढली आहे. या नाराज नेत्यांनी आज इंदापुरात भव्य मेळावा घेत प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शरद पवार गटाचे नेते आणि सोनई ग्रुप संस्थापक दशरथ माने यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना मोठा इशारा दिला.
“माझ्या राजकीय ३५ वर्षाच्या कारकिर्दीत एवढी मोठी सभा पहिल्यांदाचं बघितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला देखील एवढे नागरिक जमत नाहीत. खासदार सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या, इंदापूरला महिला जमत नाहीत. जरा हे महिलांचं मोहोळ बघा. हे (हर्षवर्धन पाटील) पक्षात शिरले. आमच्या शरद पवारांचा तंबूच घेऊन गेले, पण इथे बांबू आहेत ना. अजूनही विनंती आहे. ही गर्दी पाहा आणि हर्षवर्धन पाटीलांना इंदापुरातून उमेदवारीचा निर्णय बदला. निर्णय बदलला नाही तर भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी या इंदापुरात झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पेक्षा मोठा पॅटर्न इंदापूरमध्ये दिसणार. आम्ही एकत्र बसू आणि अपक्ष उमेदवार देऊ”, असा मोठा इशारा दशरथ माने यांनी दिला आहे.
“सुप्रिया ताई अजूनही ऐका निर्णय बदला. तो चांगला दिसतो, उंच दिसतो. पण मग त्याला आमच्या बोकांडी का बसवता? त्याला त्या पंतप्रधानच्या मोदीच्या ठिकाणी नेवून बसवा की. हा आमच्या तंबूत का घुसतोय? सगळ्या पक्षाचं थोडंथोडं खातोय, अशी टीका देखील दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश होणार असल्याच्या चर्चेपासून मान, अप्पासाहेब जगदाळे आणि प्रविण माने हे नेते नाराज होते. त्यांनी या पक्षप्रवेशावर आक्षेप घेऊनही हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश झाला त्यानंतर त्यांना उमेदवारी देखील दिली. त्यावरुन नाराज नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेत अपक्ष उमेदवार देण्याचा इशारा दिला आहे. आता शरद पवार यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बोपदेव घाट प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अद्याप अटक नाही
-ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार हाती घड्याळ घेणार! शरद पवारांच्या आमदाराला देणार टक्कर
-डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेचा ‘हा’ मोठा निर्णय
-बोपदेव घाट प्रकरणातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात; आणखी दोघांचा शोध सुरु