पुणे : राज्यात या आठवड्याभरात केव्हाही विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राजकीय गाठीभेटी, बैठका, सभा, मेळावे तसेच उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने इच्छुकांचे पक्षांतर अशा साऱ्या घडामोडी राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.
शिवसेना जिल्हाध्यक्ष असलेले माऊली आबा कटके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे. त्यांचा पक्षप्रवेश सोहळाही लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंच्या या शिलेदाराला अजित पवार राष्ट्रवादीत घेत थेट विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देत मैदानात उतरणार असल्याचेही बोलले जात आहे. शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरेंचा खास शिलेदार पक्ष सोडणार असल्याने ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसणार आहे.
माऊली आबा कटके अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले, अन् त्यांना शिरुर विधानसभेची उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यापुढे हे आव्हान असणार आहे. अशोक पवार यांचे शिरुर मतदारसंघावर २००९ ते २०१४ आणि त्यानंतर २०१९ पासून त्यांचे वर्चस्व आहे. तेच मोडीत काढण्यासाठी माऊली आबा कटके यांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेचा ‘हा’ मोठा निर्णय
-बोपदेव घाट प्रकरणातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात; आणखी दोघांचा शोध सुरु
-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आमदार माधुरी मिसाळांनी सांगितला ‘तो’ किस्सा
-बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार