पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती असलेल्या डेक्कनमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आहे. या पुतळ्याबाबत पुणे महानगपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या पुतळ्यावर महापालिकेच्या वतीने मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. तसेच येथील स्मारक आणि गरवारे भुयारी मार्गाच्या परिसराचे सुशोभीकरण देखील केले जाणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी आमि भुयारी मार्गाच्या सुशोभिकरणासाठी ४७ लाख २७ हजार रुपयांच्या निविदेला नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. डेक्कनमध्ये असणाऱ्या या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर मेघडंबरी उभारण्यात यावी, तसेच येथील परिसराचे सुशोभीकरण केले जावे, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती.
वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडून ही मागणी होत होती. ही मागणी आता पालिका प्रशासनाने मान्य केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी भवन विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली होती. यानंतर पालिकेच्या भवन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती चौथरा उभारण्यात येणार आहे. त्यावर पॉलिस्टर रेझिनचा वापर करून आकर्षक मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. तसेच अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना उभे राहता यावे, यासाठी देखील नव्याने चौथरा तयार करण्यात येणार आहे. या चौथऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या उभारल्या जातील. तसेच दगडी बांधकामामध्ये सुशोभीकरण केले जाईल. यासाठी भवन विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बोपदेव घाट प्रकरणातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात; आणखी दोघांचा शोध सुरु
-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आमदार माधुरी मिसाळांनी सांगितला ‘तो’ किस्सा
-बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार