पुणे : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोर्चेबांधणीला जोरदार सुरवात केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास बळावल्याने अनेक मतदारसंघांवर मित्रपक्षांकडून दावा करण्यात येत आहे. अशातच पुण्यातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या वडगाव शेरी मतदारसंघांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आमनेसामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वडगाव शेरी मतदारसंघ शिवसेनेला सोडला नाही तर त्याचा फटका मित्रपक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर महाविकास आघाडीकडून पुणे जिल्ह्यातील एकच जागा देणार असून शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते नितीन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘शिवसेनेने गेल्या पाच वर्षात अनेक संकटांचा सामना केला. आपल्याच लोकांनी दिलेला धोका पचवून आता लोकसभेत दमदार कामगिरी करत आपला झुंजार बाणा दाखवून दिला. नवीन मित्रांना सोबत घेत प्रामाणिकपणे काम करत शिवसेना कार्यकर्त्यांनी लोकसभेत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. सत्ताधारी पक्षांकडून होत असलेली मुस्कटदाबी सहन करत काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान केले’, असे नितीन भुजबळ म्हणाले आहेत.
‘लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकमेकांचा सन्मान राखला गेला त्याच पद्धतीने महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचा सन्मान राखला जाणे आवश्यक आहे. याबाबत मी स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटून सामान्य शिवसैनिकांची भावना बोलून दाखवली आहे. सोबतच वडगाव शेरी हा मतदारसंघ सेनेसाठी सोडावा अशी विनंती केली आहे. जर शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला तर निश्चितच विजयासाठी प्राण पणाला लावू. मी स्वतः तर इच्छुक आहेच मात्र आमच्या नेत्या सुषमा अंधारे देखील एक सक्षम उमेदवार होऊ शकतात’, असेही नितीन भुजबळ म्हणाले आहेत.
‘आमच्याकडे ताकतीचे उमेदवार आहेत, आमचे संघटन राष्ट्रवादीपेक्षा मजबूत असून नेते मंडळींची फौज आमच्याकडे आहे. जनतेचे मोठ्याप्रमाणात समर्थन आम्हाला मिळत असून जनतेतूनच हा मतदारसंघ सेनेकडे दिला जावा अशी मागणी होत आहे. इतर पक्षांप्रमाणे आमच्या पक्षात उमेदवारीवरून कोणतेही मतभेद नाहीत. आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या कडे देखील याबाबतचा अहवाल सुपूर्द केला, असून शिवसैनिकांच्या मेहनतीचा आणि जनतेचा आग्रह लक्षात घेऊन हा मतदारसंघ महाविकास आघाडीत एकमताने आम्हाला दिला जाईल असा विश्वास मला वाटतो’, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा; आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश
-‘…तर आबा बागुल कधीच मंत्री झाले असते! पण आता आम्ही प्रयत्न करतोय’- थोरात
-काकांचा-पुतण्याला धक्का; ‘हा’ माजी आमदार तुतारी फुंकण्याच्या तयारीत
-सुनील शेळके अजितदादांसमोर भर सभेत म्हणाले, ‘तुम्हाला दादागिरी आणि दहशत करायची असेल, तर…’