पुणे : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये संघर्ष तीव्र झाला असून २ मतदारसंघात उमेदवारीसाठी थेट पिता-पुत्र दोघेही इच्छुक असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये एक रंजक ट्विस्ट आला आहे. वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने दावा केला आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात नुकतेच भाजपतून राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले बापूसाहेब पठारे आणि त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे दोघेही निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत. यामध्ये बापूसाहेब पठारे हे वडगाव शेरीचे माजी आमदार आहेत. सुरेंद्र पठारे यांनी देखील गेल्या काही महिन्यापासून हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे आता शरद पवार सुरेंद्र पठारे यांच्या रूपाने युवा चेहरा अजित पवारांच्या सुनील टिंगरे यांच्या विरोधात उतरवतात की पुन्हा एकदा बापूसाहेब पठारे यांना संधी देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मात्र आत्ता तरी राष्ट्रवादीतून तिकीट मिळवण्यासाठी पठारे पिता पुत्र हे दोघेही शर्यतीत असल्याने वडगाव शेरीत रंजक ट्विस्ट आला आहे. दुसरीकडे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. कारण काँग्रेसकडून कॅन्टोन्मेंट मतदारसंघात माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे हे दोघे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ज्या उमेदवाराचा सलग दोनदा पराभव झाला असेल त्याला तिसऱ्यांदा तिकीट द्यायचं नाही असा निर्णय झाला आहे.
ऐनवेळी रमेश बागवे यांना तिकीट न मिळाल्यास अविनाश बागवे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा बी प्लॅन बागवे कडून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आत्ता दोघेही पिता पुत्र निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुण्यातल्या या सगळ्या टफ फाईट मध्ये या दोन मतदारसंघात मात्र रंजक ट्विस्ट आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अल्पवयीन आरोपींचं वय किती असावं? अजित पवार करणार शहांकडे मोठी मागणी
-“तो जिंकला पाहिजे” सुरज चव्हाण जिंकण्यासाठी पवार कुटुंबानं केलं बारामतीकरांना आवाहन
-हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! ‘या’ शुभ मुहूर्तावर फुंकणार ‘तुतारी’