पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चितीसाठी भाजपमध्ये घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी पुणे शहरातील सहा मतदारसंघांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची पसंती जाणून घेण्यात आली. आपल्या पसंतीनुसार तीन इच्छुकांची नावे बंद लिफाफ्यात देण्यात आली आहेत. एका बाजूला सहा मतदारसंघांमध्ये ही प्रक्रिया राबविण्यात आली असली, तरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार असणाऱ्या वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये मात्र भाजपने ही प्रक्रियाच घेणं टाळलं आहे. त्यामुळे हे मतदारसंघ मित्र पक्षाला सोडल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. दुसरीकडे वडगावशेरीतील इच्छुक माजी आमदार जगदीश मुळीक यांना अद्यापही उमेदवारी मिळण्याची आशा कायम आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात ज्याचा विद्यमान आमदार त्याला मतदारसंघ सोडण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे वडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघात भाजपने मित्र पक्षांसोबत वाद टाळण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्याची प्रक्रियाच टाळली. यामुळे भाजपने दोन्ही मतदारसंघावरील दावा सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांची धाकधूक वाढल्याचं दिसत आहे. वडगाव शेरीमध्ये माजी आमदार जगदीश मुळीक हे उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही असून याबद्दलची भूमिका स्पष्टपणे मांडली देखील.
दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघात भाजपकडून पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यात आला नसल्याबद्दल विचारला असता मुळीक म्हणाले, “काल शहरामध्ये पहिला टप्प्यातील प्रक्रिया राबवण्यात आली. यापुढे देखील दुसरा किंवा तिसऱ्या टप्प्यात वडगाव शेरी मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची पसंती जाणून घेतली जाऊ शकते. उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही असून येथे भाजपचा उमेदवारच विजयी येऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-
-‘कही खुशी, कही गम’: भाजपच्या इच्छुकांना टेंशन, दोन मतदारसंघाचा दावा सोडला
-अजितदादांच्या मेळाव्याला आमदारांची दांडी; पक्षांतराच्या चर्चेवर सुनील टिंगरे म्हणाले,….
-‘ये बंधन तो…’ बारामतीत पवार काकी-पुतण्या आले आमने-सामने; पुढे काय घडलं?
-खडकवासल्यात भाजप नेते भिडले; विद्यमान आमदारांनी केली इच्छुकांची बोलती बंद, नेमकं काय प्रकरण?
-पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादीतील बंडाचं नेमकं कारण काय? भाजपचंही टेंशन वाढलं