पुणे : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात अनपेक्षित विजय मिळवला आहे. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात तुफान इनकमिंग सुरु असून अद्यापही अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी अनेकांच्या रांगा लागल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते प्रवेश करण्यासाठी इच्छुक असून यामध्ये सर्वाधिक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचे सांगितले जात आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील दोन आमदार तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या नियोजन बैठकीला शहरातील आमदार चेतन तुपे आणि आमदार सुनील टिंगरे यांनी दांडी मारल्याने अनेक उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप दिला तरीही आमदारांनी दांडी मारल्याने त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्त्वाखाली सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या या मेळाव्यामध्ये २ विशेष ठराव मंजूर करण्यात आले. ‘भविष्यात अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तसेच, बारा राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून दीपक मानकर यांना विधानपरिषदेवर पाठवावे,’ असे दोन ठराव यावेळी मंजूर करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुनील तटकरेंना मुंबईहून रायगडला नेणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरचा अपघात; तिघांचा मृत्यू
-कसब्यात ‘पोस्टरवॉर’! रासने समर्थक लागले कामाला; ‘तैयार है हम’चा दिला नारा
-पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा
-भाजपचं ठरलं! ४ मतदारसंघात विद्यमानांना पसंती, पण कॅन्टोन्मेंट अन् कसब्याचं काय?
-काकांचा पुतण्याला आणखी एक मोठा धक्का; विलास लांडेंचं तुतारी फुंकणं फिक्स, कोणी केली घोषणा?