पुणे: शहरात हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा आज रद्द करण्यात आला. शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे लोकार्पण तसेच स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासह इतर विकासकामांचे भूमिपूजन आज करण्यात येणार होते. मोदींचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून भाजपवर टीकेची छोड उठवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या पैशाची भाजपकडून उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आला आहे. तर उद्या सामान्य पुणेकरांना सोबत घेत मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आलाय. आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित कार्यक्रम कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे किंवा भाजपच्या दुसऱ्या कार्यक्रमामुळे रद्द झाला नाही. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आणि गेल्या २ दिवसापासून पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे, पुढे हि एक दोन दिवस असाच पाऊस सुरु राहणार आहे. या कारणामुळे मोदींचा नियोजित दौरा पंतप्रधान कार्यालयाकडून रद्द करण्यात आला आहे. परंतु महाविकास आघाडीकडून पुण्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी होणारी टीका म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम आहे”, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
दोन तीन अपवाद सोडता महाविकास आधाडीतील घटकपक्षांचीच सत्ता पुण्यात राहिली आहे. या विस्तृत सत्ताकाळात यांनी शहराचं काय भलं केलं ते सांगायला यांच्याकडे काही नाही. पुण्याची सर्वात महत्वाची समस्या आहे वाहतूक. हा प्रश्न सोडवण्यापेक्षा वाढवण्याचे पाप काँग्रेस व राष्ट्रवादीने केले आहे. आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सोयीचे जाईल अशा पद्धतीने BRT चे नियोजन केले गेले. पुणेकरांचे अतोनात हाल झाले पण प्रश्न मात्र अजिबात सुटला नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
सबसे बडा खिलाडी आणि पुण्यातील सर्वात जास्त पेट्रोल पंप व चारचाकीची एजन्सी ज्याच्याकडे आहे, तो सार्वजनिक वाहतूक सुधारून कशाला स्वतःच्या पोटावर पाय आणेल. स्वयंघोषित जाणते राजे सुद्धा पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या स्वतःच्या मित्रांच्या दुचाकी किंवा चारचाकी च्या व्यवसायास का अडचणीत आणतील. १९८४ साली भारतात कोलकातामध्ये मेट्रो धावली. परंतु पुण्यात त्यासाठी २०२१ उजाडावे लागले, तेही भाजपच्या काळातच मेट्रो सुरु झाली. भविष्यात मेट्रो पुण्याच्या चारही दिशांना धावणार आहे, असेही पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, फक्त खोटे नॅरेटिव्ह लोकांसमोर मांडायचे आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट करायचा हेच त्यांचे धोरण आहे. मुंबईमध्ये मेट्रोला विरोध करणारे पुण्यात मेट्रोचे उदघाटन एक आठवडा पुढे ढकलले गेले म्हणून नक्राश्रू काढत आहेत. त्यांचा खरा विरोध हा आज होणाऱ्या २२,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांना आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.