पुणे : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे इच्छुकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील आता पोस्टर्स आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. यावरूनच आता एक नवीन वाद उफाळून येताना दिसत असून कसब्यात लागलेले बॅनर्स याला कारणीभूत ठरतायेत. “आमचं ठरलंय! कसबे धंगेकर ना भाई ना ताई” अशा आशयाचे बॅनर्स कसबा मतदारसंघात झळकले आहेत. काँग्रेसमधीलच एका गटाला या पोस्टच्या माध्यमातून टार्गेट केलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दीड वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयासाठी काँग्रेसमधील गटातटाचे वाद विसरून सर्व नेत्यांनी एकत्रित काम केलं. तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील त्यांना साथ मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांनाच पसंती देत उमेदवारी दिली. मात्र हीच गोष्ट आता काँग्रेसमधील एका गटाला पसंती पडत नसल्याचं दिसत आहे. एकाच व्यक्तीला किती पदे दिली जाणार? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे कसबा विधानसभेसाठी धंगेकर यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसत आहे.
काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे या कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अरविंद शिंदे यांना कार्यकर्त्यांकडून भाऊ तसेच भाई देखील म्हंटले जाते. तर कमल व्यवहारे या ताई नावाने सर्वत्र परिचित आहेत. या दोन्ही नेत्यांना टार्गेट करून धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांकडून हे फ्लेक्स लावण्यात आल्याची चर्चा रंगलीय. यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार करणार अजितदादांची कोंडी; ‘त्या’ १२ मतदारसंघात लावली जोरदार फिल्डींग
-दौरा मोदींचा, शक्तीप्रदर्शन इच्छुकांचं; शहरभर झळकले बॅनर्स
-वडगाव शेरीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा कायम; महाविकास आघाडीत रस्सीखेच
-वाहतूक कोंडीची हद्द झाली! प्रवाशी नाश्ता करुन आले तरी गाड्या जागच्या हलल्या सुद्धा नाहीत