पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. पुण्यातील सर्वात चर्चेच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे आणि भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह महायुतीकडून अनेक जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच आता मुळीक यांनी थेट मतदारांना पत्र लिहीत आवाहन केले आहे.
मुळीक यांनी पत्रात काय लिहले आहे?
“पत्ररूपाने तुमच्याशी संवाद साधताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल तुमच्या सहकार्याने बहरली. तुमचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद भरभरून लाभले. माझ्यासाठी हे आशीर्वाद बहुमोल आहेत. माझ्या विस्तारीत कुटुंबाशी म्हणजेच तुमच्याशी संवाद साधताना खूप समाधानाची भावना आहे. कुटुंबातूनच मला समाजकाऱ्यांचे बाळकडू मिळाले. समाजकारणाचा पिंड जोपासला गेल्यानेच २००१ मध्ये विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय प्रवास सुरू झाला.”
“२०१४ मध्ये वडगावशेरी मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी तुमच्यामुळेच लाभली. त्या ५ वर्षांत आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतदारसंघाला एक नवे रूप दिले. भामा आसखेड, शंभर खाटांचे रुग्णालय, मेट्रो, उड्डाणपुल यांसारखे अनेक प्रकल्प मार्गी लावले. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कृतीशील राहिलो. आपल्या अथक प्रयत्नांनंतरही २०१९ साली विधानसभा गाठण्यात थोडक्यात अपयश आले. पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. तुमची साथ होतीच, त्यामुळे दुप्पट जोमाने लढण्यासाठी, समाजसेवेसाठी सज्ज झालो.”
“भाजपचा शहराध्यक्ष असताना राज्यातील त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना आधार देण्याची आणि आरोग्यसेवा पुरवण्याची गरज होती. ती पक्षसंघटनेच्या माध्यमातून पूर्ण केली. विकासकामांसाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आंदोलने केली, पक्ष संघटना वाढवली आणि मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहिलो. शिक्षक सन्मान, विद्यार्थी सत्कार, महिला सन्मान, आरोग्य शिबिरे, स्पर्धांचे आयोजन, सर्व सार्वजनिक उत्सव, बागेश्वर धाम, जया किशोरी यांचे प्रवचन अशा अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत गेलो.”
विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवे आहेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल. याच हेतूने आपल्याशी हा संवाद. तुमचे सहकार्य लाभेल हा विश्वास आहे, असे जगदीश मुळीक मतदारांना लिहलेल्या पत्रात म्हणाले आहेत. जगदीश मुळीक यांनी लिहलेल्या पत्राने मतदारांवर काय परिणाम होणार आणि महयुतीमध्ये नेमकं काय राजकीय नाट्य पहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणुकीपूर्वीच शिरुरमध्ये राडा; घोडगंगा साखर कारखान्याच्या सभेत ‘अशोक पवार चोर है’चा नारा
-..अन् बघता बघता महापालिकेचा ट्रक गेला थेट खड्ड्यात; नेमका काय प्रकार?
-आयफोन प्रेमींसाठी खूशखबर; आता घरबसल्या अवघ्या १० मिनिटात आयफोन १६ मिळणार हातात, कसा ते वाचा
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; ओबीसीच्या ‘या’ बड्या नेत्यांने हाती घेतली ‘तुतारी’
-‘त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन’; अजितदादांच्या कट्ट्रर समर्थकांची बंडखोरीची भाषा