पुणे : राज्यात एकीकडे विधानसभेची रणधुमाळी आहे तर एकीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष.. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तसेच मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यावरुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी नितेश राणेंनी मुस्लिम समाजाची माफी मागवी, अशी मागणी केली आहे.
‘नितेश राणे हे सातत्याने सामाजिक समतोल बिघडेल अशी बेताल वक्तव्य करत आहेत. मुस्लिमांना मस्जिदीत जाऊन ‘चुन चुन के मारेंगे’, ‘पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत’ या सारख्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, एका सांविधानिक पद्धतीने निवडून आलेल्या आमदाराच्या तोंडी अशी हिंसक भाषा शोभत नाही, आम्ही त्यांच्या व्यक्तव्याचा तीव्र निषेध करतो, तसेच राणे यांनी भविष्यात अशी प्रक्षोभक वक्तव्य करू नये आणि मुस्लिम समाजाची माफी मागावी’, अशी मागणी परशुराम वाडेकर यांनी केली आहे.
‘…तर आम्ही मुस्लीम समाजाच्या संरक्षणासाठी पुढे येणार’
“शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. अलीकडे राज्यातील काही नेते जाणीवपूर्वक हिंदू – मुस्लिम समाजात दुही निर्माण होईल अशी वक्तव्य करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही वक्तव्ये करण्यात येत आहेत याचा परिणाम महायुतीमधील आमच्यासारख्या सहयोगी पक्षांना बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे संविधान बदलाच्या चर्चा सुरू झाल्या. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील महायुतीच्या मतांवर झाल्याचे दिसते. रिपब्लिकन पक्ष भारतीय संविधानाला मानणारा आणि धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य देणारा आहे. सामाजिक सलोखा राखण्यास नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे. एखाद्या नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणाने समाजातील एखाद्या घटकाला असुरक्षित वाटत असेल तर त्या समाजाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव पुढे राहू. राणे यांनी मशीदमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी पुढे येणार”
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू – मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी करू नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सक्त ताकीद द्यावी तसेच अन्य नेत्यांना आणि संतांना सुद्धा बेताल, हिंसक प्रक्षोभक वक्तव्य करू नयेत अशी समज द्यावी अशी मागणी परशुराम वाडेकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘उन्माद दाखवत असाल तर…’; अमोल कोल्हेंचा दिलीप वळसे पाटलांना इशारा
-श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक; सिंहरथ अन् ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत
-Pune: लाडक्या गणरायाचं जल्लोषात आगमन; भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था कशी असेल?
-काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; धंगेकरांच्या उमेदवारीला कोणी केला विरोध?