पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मिळलाच, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच खासदार शरद पवार यांनी पुतणे अजित पवारांना धक्क्यांवर धक्के द्यायला सुरवात केली आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. आता आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे अजित पवार गटाचे शहराध्य म्हणून कामगिरी पार पाडलेल्या अजित गव्हाणेंना शरद पवारांनी आपल्या पक्षात घेतलं. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या राजकीय गाठीभेटी, सभा, बैठकांदरम्यान शरद पवार राज्यभर दौऱ्यावर आहेत. मंगळवारीच कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजीत घाडगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अशातच शरद पवार आता पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कातंत्र वापरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
चिंचवडमधील अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे यांनी जयंत पाटलांशी चर्चा केली असून ते आता शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे. नाना काटे यांनी आता आगामी विधानसभा लढण्याचा निश्चय केला आहे. नाना काटे यांनी अजित पवारांना आता माघार नाही, असं स्पष्ट कळवलं असल्याचंही बोललं जात आहे.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या विद्यमान आमदार असल्याने ही जागा भाजपकडे जाणार असल्याचे समजताच नाना काटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘जर जागा सुटली नाही, तरी मी उभा राहणार आहे त्यात काही वाद नाही. पण घड्याळाला जागा मिळाली नाही तरी देखील मी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता ही जागा भाजपने सोडली नाही तर या मतदारसंघात पुन्हा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे’, असे नाना काटे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेकडून रस्तांची मलमपट्टी; ९ दिवसांत किती खड्डे बुडवले?
-पर्वतीत आबा बागुलांनी ठोकला शड्डू, कार्यकर्तेही लागले कामाला; बॅनर्स झळकवत….
-भक्तांच्या ‘त्या’ मागणीचा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने राखला मान, काय होती मागणी?
-अमोल कोल्हेंनी लोकसभेत केली बिबट्याच्या नसबंदीची मागणी; मनेका गांधी म्हणाल्या, ‘त्यापेक्षा..’