पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला शनिवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील दत्त सांप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून जटोली मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेशच्या सोलन मधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे. जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटावरून पडले आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते, असे मानले जाते.
गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येत असून त्यावर रंगकाम करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.
शनिवार प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून सिंह रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून २ सिंहाच्या प्रतिकृती रथावर लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सव मंडपात दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सौरभ रायकर, विशाल केदारी, राजाभाऊ घोडके, सिद्धार्थ गोडसे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन अजित पवार एकनाथ शिंदेंना म्हणाले, ‘यामुळे….’
-कॅन्टोन्मेंटमध्ये बदलाचे वारे! कुरघोडीच्या राजकारणात बागवेंचा पत्ता कट? साळवेंना काँग्रेसचं बळ
-पुजा खेडकर प्रकरणी पुण्यातील वायसीएम रुग्णालयासह अधिष्ठताही अडचणीत; वाचा नेमका काय प्रकार?
-धक्कादायक! आईच्या प्रियकरानेच अल्पवयीन मुलीसोबत केलं ‘हे’ कृत्य; आईचं दुर्लक्ष, पण…