पुणे : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू उपचारसाठी आज पुण्यात दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने दिलासा देत आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. पुण्यातील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये आसाराम बापूवर उपचार सुरू आहेत.
आसाराम बापूला वैद्यकीय कारणासाठी ७ दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाराम बापूला ह्रदयविकाराचा त्रास होत होता. पुण्याच्या खाजगी कॉटेजमध्ये ठेऊन त्याच्यावर हृदयाशी निगडित आजारावर उपचार केले जाणार आहेत. आता त्याला पोलिस कोठडीमध्ये राहूनच हे उपचार घ्यावे लागणार आहेत.
आसाराम बापूला येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने पुण्यात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती पी.एस. भाटी आणि न्यायमूर्ती मुन्नारी लक्ष्मण यांच्या पीठाने हे निर्देश दिले आहेत.