पुणे: पावसाच्या कोसळत्या धारा अन् हजारो महिलांच्या साक्षीने पर्वती विधानसभा मतदारसंघात भव्य महिला मेळावा आणि लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. पुणे लोकसभा समन्वयक तथा पालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या माध्यमातून पर्वती विधानसभा मतदारसंघातील या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विशेष उपस्थिती लावली.
पुण्यनगरीत मुसळधार पाऊस सुरू असताना गणेश कला क्रीडा मंच येथे सुमारे हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींचा फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “पर्वती विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींसाठी त्यांचा लाडका आणि हक्काचा भाऊ असणाऱ्या श्रीनाथजींनी अतिशय उत्कृष्ट अशा मेळाव्याचे आयोजन केले आहे. पुण्यनगरीत आल्यानंतर स्त्री शक्तीचा असा जल्लोष पाहून मला अतिशय आनंद होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला भगिनी केवळ सहभाग नोंदवत नाही तर अग्रेसर आहेत. आपल्या सर्व महिला भगिनींना प्रोत्साहन देणे, आपल्या कार्यकर्तृत्वास वाव देणे आणि समाजात जीवन जगत असताना महिलांचे संरक्षण करणे या सर्व गोष्टी एका आदर्श भावाकडून होत असतात श्रीनाथ भिमाले पर्वती विधानसभा मतदारसंघात करत असलेले कार्य अतिशय बहुमोल आहे”
या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस यांच्यासह राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मा.नगरसेविका वंदनाताई भिमाले, सरस्वती शेंडगे, प्रसन्न जगताप, राजेंद्र आबा शिळीमकर, सम्राट थोरात, अनुसया चव्हाण, सरचिटणीस गणेश घोष, हरीश परदेशी, डॉ.तेजस्विनी गोळे, युवा मोर्चाचे सरचिटणीस अभिषेक भिमाले आदींसह मोठ्या संख्येने पर्वती विधानसभा मतदारसंघातील महिला उपस्थित होत्या.