पुणे: कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. गेली पंधरा दिवसांपासून सुरू असणाऱ्या आरोग्य शिबिरात जवळपास 12 हजारांच्या वर नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांना चष्म्यांचे मोफत वाटप देखील करण्यात आले.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असल्याने अनेकदा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, ही परिस्थिती लक्षात घेत उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या विशेष सहकार्यातून आणि निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त १ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध १५ ठिकाणी आरोग्य शिबीर राबवण्यात आले. महिलांसाठी कर्करोग तपासणी, तोंडातील कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे वाटप, दंत तपासणी, छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी, कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर तपासणी आदी १०,५०० रुपये पर्यंतच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. यासोबतच गरज असणाऱ्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी हेमंत रासने यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी मतदारसंघातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर हेमंत रासने म्हणाले, “१५ दिवसांच्या कालावधीत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहून मला मनापासून आनंद वाटला. या उपक्रमाने नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी केली, ज्यामुळे हा उपक्रम निःसंशयपणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये १५ ठिकाणी करण्यात आले होते. प्रत्येक प्रभागात दर दिवशी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.”