पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहिर केला. हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.
यासंदर्भात सदस्या श्रीमती अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी २०१७ पासून प्राणिसंग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही.
दरम्यान, २०१७ ते सन २०२३ या कालावधीत एकूण ३६ प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. ३६ प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणीसंग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.