श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन, मुंबई व ओएनजीसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमात तब्बल १२२ मूकबधिर मुले व ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले. सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल याविषयी जनजागृती करीत आहेत, हे विशेष.
यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, तुषार रायकर आदी उपस्थित होते.
महेश सूर्यवंशी म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे. पहिल्या टप्प्यात २२० हून अधिक रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले होते. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. आजच्या कार्यक्रमात १२२ रुग्णांना यंत्र देण्यात आले.
लहान मुलांना ऐकायला येत नाही, हे पालकांना लवकर कळत नाही. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जी मुले आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे. मुलांना ऐकायला येत नसेल तर ती केवळ ऐकू शकत नाहीत, असे नाही तर यामुळे अनेक मुले बोलायला देखील शिकत नाहीत. त्यामुळे याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करुन देण्याकरिता दानशूरांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.